माझ्या दृष्टिकोनातून भगवान शिव..🌸

' शिव ' या नावातच एवढा अर्थ दडला आहे की तो काहीशा परिच्छेदांमध्ये व्यक्त करणे शक्य नाही.तरीही, मी माझ्या प्रमाणे तो व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे.
       ' शिव ' मधल्या ' शि ' चा अर्थ ऊर्जा असा होतो, आणि आपण आपल्या हिंदू संस्कृती मध्ये स्त्रीला ऊर्जा, शक्तीचे प्रतीक मानतो. आणि विशेष म्हणजे इंग्रजी भाषेत सुद्धा "she" स्त्री दर्शक शब्द म्हणून वापरला जातो. तर मग ' शि ' चा आपण जप करीत राहिलो, तर ती ऊर्जा दिशाहीन होईल. याच कारणास्तव ' व ' हे अक्षर "वाम" या अर्थी घेतलं जातं,ज्याचा अर्थ होतो "प्रविणता". म्हणजेच ऊर्जेला योग्य दिशा देणे म्हणजे शिव..!
       याच "शिव" शब्दाचा आणखी एक अर्थ होतो तो म्हणजे 'जी गोष्ट नाहीये अशी ती'. म्हणजेच आपल्या सगळ्या कल्पनांच्या ही पुढे, जिथपर्यंत आपण विचार करू शकतो, त्या विचारशक्तीच्या ही पुढे जी गोष्ट उपस्थित आहे ती म्हणजे शिव..!
      हा शिव विशेष म्हणजे निराकारी आहे, त्याला कोणताही आकार नाही. मात्र त्याचं अस्तित्व हे चराचरात, कणाकणात आहे. तो आपल्याला डोळ्यांनी दिसत जरी नसला, तरी भक्तिमय दृष्टीने आपण त्याला अनुभवू शकतो. निर्वाण षटकम् मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याला कोणताही आकार नाही, त्याला कोणताही विकल्प नाही, तो सगळ्यांमध्ये सामावलेला आहे, जो सगळ्यांसाठीच समान वागणूक देत आलेला आहे, जो मुक्तीसाठी बांधील नाही, असा तो चिदानंद रूप शिव आहे..!
      खूप मोठ्या लोकांमध्ये आजही एक समज घर करून बसलेला आहे, की हे शिव,शंकर,भैरव,रुद्र हे एकाच सत्पुरुषाची नावे आहेत, मात्र सत्य हे त्याहून विपरीत आहे. शिव ही एक अनादि-अनंत असा एक ऊर्जेचा भाग आहे. त्यापासूनच ब्रम्हा-विष्णू-महेश या तिघांची उत्पत्ती झालेली आहे. सर्वसाधारणपणे ब्रम्हा कडे जन्म देण्याचे, विष्णूकडे जग चालवण्याचे, व महेश म्हणजेच शंकर याकडे  संहाराचे काम सोपविलेले आहे, हे आपणास ठाऊक आहे . आणि त्याच मुळे या तिघांनाही एक आकार आहे, त्यांची मूलभूत तत्वे, चिन्हे आहेत, ज्यावरून आपण त्यांना ओळखतो. मात्र शिव या तिघांचीही शक्ती आत्मसात असलेली अशी एक शक्ती आहे, जी या तिघांचंही काम पार पडू शकते. या शिवाचे अनेक रूप आपल्याला शिवपुराण मध्ये पाहण्यास मिळतात. यात 11 रुद्र, २ भैरव, तसेच वीरभद्र, मणिभद्र, चंदिस, नंदी, श्रृंगी, भृगिरिटी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, जय आणि विजय. यांशिवाय पिशाच, दैत्य, नाग-नागिन, पशु यांनाही शिवाचे प्रमुख गण मानले जातात.
         सर्वसाधारणपणे श्रीकृष्ण जे गीतेमध्ये सांगत आहे, कि मी चराचरामध्ये वसलेलो आहे, ती चराचरामध्ये असलेली शक्ती म्हणजेच शिव..! थोडक्यात म्हणायचं झालं, आपल्यामध्ये असलेलं, सजीव सृष्टी मध्ये असलेलं चैतन्य (spirit) म्हणजे शिव. 
आपण ज्या शिवलिंगाची पूजा करतो, त्यात शिव नक्कीच असतो, मात्र ते रूप शंकराचं असतं. शंकर आणि शिव मधला फरक म्हणायचं झालं, तर शंकर हा चिन्हांकित आहे, लोक त्याची मूर्ती, त्याचे स्वरूप डोळ्यासमोर आणून ध्यानधारणा करू शकतात. किंबहुना याच कारणासाठी मूर्ती पूजेची सुरुवात झालेली आहे. कारण लोक अप्रत्यक्षपणे असलेल्या शक्तीची, ऊर्जेची पूजा करणे शक्य नाही. आणि त्यामुळेच आपण पाहतो , कि शंकराला मानवी रूपात दर्शविले जाते, जेणेकरून लोक त्याचे आपल्या भोवती असलेले अस्तित्व अनुभवून, त्याचे चित्र मनात तसेच डोळ्यासमोर आणून त्याची आराधना करू शकतील.
आणि शिव म्हणजे ती शक्ती, जी आपल्यामध्ये चैतन्य टिकवून ठेवते, व तसेच आपल्याला नेहमीच जगण्यासाठी बळ देते.
   खाली एक लिंक देत आहे, जेणेकरून भगवान शिव बद्दल आपण पण आणखी सखोल माहिती घेऊ शकाल. 😊🌸
     या ब्लॉग मध्ये मी भगवान शिव बद्दल लिहिण्यास सुरुवात केली आहे, यापुढे याच विषयावर अनेक गोष्टी लिहिण्याचा माझा मानस आहे. म्हणजेच ही फक्त एक सुरुवात आहे...🙌🏻🌸

टिप्पण्या